Jump to content

राजगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजगडाचा नकाशा
राजगडाचा नकाशा

राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैऋत्येला

४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारी होय.

इतिहास - राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. या मुरूंबदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजा ज्याने युद्धात शकांना हारवून इ.स ७८ साली स्वतःच्या नावाचं शक सुरू केले, यानेच आठ वर्षांपूर्वी इ.स ७० साली ह्या मुरूंबदेवाच्या डोंगरावर सुंदर असा व उंचपुरा राजगड किल्ला बांधला. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २५ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही ��पल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.

१) 'राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचे नेते छत्रपती शिवाजीराजे भेासले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.' -जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे)
२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो- 'राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे (१ कोस = ३.२ कि.मी ). त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.'
३) महेमद हाशीम खालीखान हा 'मुन्तखबुललुबाब-ए-महेमदॉशाही ' नामक ग्रंथामध्ये म्हणतो, 'राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु? काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार ! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशू दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते.

सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वीपासून हा डोंगर प्रसिद्ध आहे, असे इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखांवरून वाटते. एका ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरून येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरून डोंगर फार पुरातन काळापासून ज्ञात असावा. राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव. हा किल्ला बहामनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते.

इ. स. १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने बालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरुंबदेव किल्ला हस्तगत केला. मुरुंबदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयत्न करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इ. स. १६२५ च्या सुमारास मुरुंबदेव किल्ला, निजामशाहीकडून आदिलशाहीकडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिळीमकर व त्याचे वडीलरुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबतरावाने मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखानाकडे दिला.

१६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बाळाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुंबदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बाळाजी नाईक जखमी झाला. या कामगिरीबद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिळीमकरांचा नंतर सन्मानही केला.

शिवाजी महाराजांनी मुरुंबदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा आज मात्र उपलब्ध नाही. त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चितच आहे. शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, 'शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.' सभासद बखर म्हणते की, 'मुराबाद म्हणून डोंगर होता त्यास वसविले. त्याचे नाव राजगड म्हणून ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या. बखरकार सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणले आहे.' मात्र शिवाजीने तोरण्यापाठोपाठ हा डोंगर जिंकून घेतला, हे नक्की. डोंगरावर किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठा झपाट्याने केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यांसही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले. इसवी सन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही ६ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले. सन १६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंग याने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मोगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली.

शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे' सत्तावीस किल्ले तांब्रास दिले. निशाणे चढविली. वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे, निळोपंत मुजुमदारसरनोबत नेताजी पालकरअसे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला.'

शिवाजी महाराज आग्ऱ्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ला राजगडाला सुखरूप पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामाचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यास राजगडावरूनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१-१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड हे स्थान राजधानीसाठी निश्चित केले, त्याआधी रायगड किल्ल्याचे इ.स १६५६ ते १६७० पर्यंत स्वराज्याचे वास्तुशास्त्रज्ञ हिरोजी इंदळकर यांच्या देखरेखीखाली १४ वर्षे बांधकाम चालू होते. त्यानंतर राजधानी राजगडावरून रायगडाकडे हलविली गेली.

बुधवार ३ एप्रिल १६८०, शा.शके १६०२ चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनूमान जयंतीला शिवाजी महाराजांच निधन झाल्यावर मराठी राज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९,शा.शके १६११ फाल्गुन अमावस्येला औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठार मारले यानंतर मोगलानी मराठांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मोगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र आप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने 'कानद खोऱ्यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मोगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्याबद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ' असा आदेश दिला होता. पुढे ११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून जावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच; त्याच उंचीचे दमदमे तयार करून त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडिमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड' असे ठेवले.

२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवासह राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला. पुढे शाहूच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहूने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली. पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाईमध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थितीमध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते - राजवाडे खंड १२. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिळीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत- खोपडे घराण्यातील होते. याशिवाय नाईकसरनाईक हे अधिकारीसुद्धा असत.

राजगडावर जाण्याचा मार्ग= राजगडावर जाण्यासाठी चोहोबाजूंनी पाऊलवाटा आहेत.वेळवंड, मळे, भूतुंडे, पाल खुर्द, वाजेघर, गुंजवणे, फणसी, या मार्गाने गडावर जाता येते.काही पाऊलवाटा वापरात नाहीत.दाटझाडी व अतिशय अवघड चढ-उतर्नीमुळे तसेच रस्ता चुकण्याच्या शक्यतेमुळे त्या दुर्लक्षित आहेत.शिवकालीन राजमार्ग असलेल्या पाल दरवाजा मार्ग गडावर जाण्यासठी साखर-वाजेघर,पालखुर्द भोसलेवाडी मार्गे चांगला रस्ता आहे. पुणे वेल्हे रस्त्यावरील मार्गासनी-गुंजवणे गावातून गेलेला रस्ता चोरदिंडीतून पद्यावती माचीवर येतो.वेळवंड खोरयतील भूतांडे गावातून अळू दरवाज्यातून गडावर जाता येते.तोरण्याच्या बूधला माचीवरून डोंगराच्या सोंडेवरून जाऊन संजीवनी माचीवर जाणारा मार्ग सहा-सात तासात गडावर पोहोचतो.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे[संपादन]

सुवेळा माची

सुवेळा माची[संपादन]

पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोड��� वर आले की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरूज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला ही तुलनेने सोपी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे; एक ब्रम्हर्षी मंदिर आहे. सुवेळा माचीवरून सुर्योदय पाहणे ही दुर्ग भाटक्यांसाठी एक पर्वणीच असते. गड किल्ल्याची भटकंतिकर्न्यसथि हे उपयुक्त आहे.


पद्मावती तलाव

पद्मावती तलाव[संपादन]

गुप्तदरवाज्याकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवाजीकालीन आहे. मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.

राजवाडा[संपादन]

रामेश्र्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. त्याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारोचे कोठार आहे. सदर ही गडावरची सर्वात महत्त्वाची अशी वास्तू आहे. या वाड्याच्या सभोवतालच्या पंचवीस एकरात महाराजांनी बागही तयार केली त्यास 'शिवबाग' असे म्हणत. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.

पाली दरवाज्याचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.

गुंजवणे दरवाजा[संपादन]

गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाज्याला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरूज आहेत. गुंजवणे दरवाज्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे.या दरवाज्याच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरून श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरून असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार शिवाजी महाराज पूर्व काळी बांधलेले असावे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पद्मावती माची लागते.

राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर,अमात्य सोनोपंत डबीर यांची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाळा, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत.याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.

पद्मावती मंदिर[संपादन]

२००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले, असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूर्ती दिसतात. मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आहे. त्याच्या उजव्या बाजूला लहान मूर्ती शिवाजी महाराजांने स्थापित केलेली आहे. या दोन मूर्तीच्या मध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच अमात्य सोनोपंत डबीर यांची समाधी आहे.

संजीवनी माची[संपादन]

सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरुवात केली गेली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरूज लागतात. या तिन्ही बुरुजांवर शिवाजी महाराजांच्या काळात प्रचंड मोठा तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरूज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळू दरवाजानेसुद्धा येता येते. आळू दरवाज्यापासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. तोरणा ते राजगड हे अंतर या मार्गे जवळचे आहे .

आळू दरवाजा : संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरण्यावरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाज्यातून जात असे. आळू दरवाजा सद्यास्थितीला बऱ्यापैकी ढासळलेल्या अवस्थेत आहे. या दरवाज्यावरील शिल्पात. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे असे दाखवले आहे.

सुवेळा माची : मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनीएवढी लांब नाही, मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडीसारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणाऱ्या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटी दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे येसाजी केक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्पयावर जाते तर डावीकडे जाणारी वाट काळेश्र्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते.

आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरू होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुसऱ्या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुसऱ्या टप्प्याकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते या खडकालाच नेढ किंवा 'हत्तीप्रस्तर' असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागातसुद्धा एक असाच गुप्त दरवाजा आहे. सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे.

काळेश्र्वरी बुरूज आणि परिसर[संपादन]

सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्र्वर मंदिराचे काही अवशेष आहेत.या रामेश्र्वर मंदिरात शिवलिंग, भग्र नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात. या रामेश्र्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्र्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.

बालेकिल्ला[संपादन]

राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे.कोणत्याही मानवानी अशा प्रकारची वास्तू रचना या पूर्वी केलेली नाही .प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरूजही ठेवलेले आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आपणास पहिला भेटते. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तर बुरूज आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.

राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात.
गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.

गडावर जाण्याची साधने[संपादन]

कर्जत, पाली, पुणे, गुंजवणे या बसस्थानकांवरून जाणाऱ्या महाराष्ट राज्य परिवहन मंडळाच्या बस,खाजगी वाहन, गाड्या जाउ शकते.

गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

१. गुप्त दरवाज्याने राजगड : पुणे - राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते. बाबुदा झापापासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. त्यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.
२. पाली दरवाज्याने राजगड : पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे खरीव या गावी उतरून कानंद नदी पार करून पाली दरवाजा गाठावा.ही वाट पायऱ्याची असून सर्वात सोपी आहे. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात
३. गुंजवणे दरवाज्याने राजगङ : पुणे-वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगाराशिवाय या वाटेचा उपयोग करू नये.
४. आळू दरवाज्याने राजगड : भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो.शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.
५. गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची : गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते.

राहण्याची सोयः

१.गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.
२.पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.
जेवणाची सोयः आपण स्वतः करावी.
पाण्याची सोयः पद्मावती मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याचे बारमाही टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: ३ तास

निष्कर्ष[संपादन]

सह्याद्रीच्या उंचीवर वसलेला राजगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून गौरवलेला हा किल्ला शिवरायांच्या शौर्य आणि राज्यकारभार कौशल्याची साक्ष देतो. नैसर्गिक सुदृढता, प्रभावी वास्तुकला आणि असंख्य ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला राजगड किल्ला प्रत्येक पर्यटकाला आणि इतिहासप्रेमीला भुरळ पाडतो. पन्हाळा गड, गुप्त दरवाजा, जलनिर्माण तळी, शिवधारा आणि महादुर्गा मंदिर या किल्ल्यावरील अनेक आकर्षणे पर्यटकांना आकर्षित करतात. ट्रेकिंग, निसर्गाचे सौंदर्य आणि इतिहास यांचे मिश्रण असलेला राजगड किल्ला हा महाराष्ट्राचा अभिमान आणि प्रत्येक मराठी माणसाने अनुभव घेण्यासारखा आहे.

किल्ले राजगडासंबंधी माहिती देणारी पुस्तके[संपादन]

  • दुर्गराज राजगड - राहुल नलावडे (रायबा)
  • राजगड दर्शन- प्र.न. देशपांडे
  • राजगडची सहल- र.द. साठे
  • स्वराज्यातील तीन दुर्ग (तोरणा, राजगड, रोहीडा)- ग.ह. खरे
  • दी डेक्कन फोर्टस् - जे.एन. कमलापूरकर
  • दुर्गदर्शन- गो.नी. दांडेकर
  • किल्ले रायगड स्थळदर्शन- आप्पा परब
  • महाराष्ट्राची धारातीर्थे (भाग १ व २)- पंडित महादेवशास्त्री जोशी
  • महाराजांच्या मुलखात- विजय देशमुख
  • सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात- वसंत चिंचाळकर
  • किल्ले- गो.नी. दांडेकर
  • शिवरायांच्या दुर्गांची दुर्दशा- गजानन शं. खोले
  • महाराष्ट्रातील किल्ले- शं.रा. देवळे
  • महाराष्ट्रातील किल्ले- श्रीकांत तापीकर
  • गिरीदुर्ग आम्हा सगे सोयरे- तु.वि. जाधव

संदर्भ[संपादन]